आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

Archive for the ‘झटपट आणि सोपे’ Category

वरण चकोल्या (चिखल्या )

वरण चकोल्या (चिखल्या )
साहित्य-
१)तूर दाल-१ कप
२)गव्हाची कणिक -२ कप
३)ओवा -१/२ टी स्पून
४)चवीनुसार मीठ

वरण चकोल्या (चिखल्या )

फोडणीसाठी-
१)जिरे-मोहोरी-१ टी स्पून
२)लसून-३ ते ४ पाकळ्या बारीक चिरून
३)हिरव्या मिरच्या-३ बारीक चिरून
४) १ लहान टोमाटो -बारीक चिरून
५)हळद-१/८ टी स्पून
६)कढीपत्ता -५ ते ६ पाने
७)गरजेनुसार तेल 
८)सजावटीसाठी कोथांबीर 
कृती-
१)प्रथम एका प्रेशर कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवावे ,पाणी गरम झाले कि त्यात धुतलेली तुरीची डाळ घालावी व झाकण लावून घ्यावे .
२)आता कणकेत ओवा आणि थोडेसे मीठ घालून कणिक मळून घ्यावी ,तयार कणकेचे समान भाग करून घ्यावेत
 .तयार कणकेची थोडी जाडसर पोळी लाटून घ्यावी व शंकरपाळे कापून घेतो तसे कापून घ्यावे ,ते ह्याप्रमाणे दिसेल.

चकोल्या

३)आता कुकरची वाफ काढून घ्यावी व झाकण उघडून त्यात ह्या कापलेल्या चकोल्या घालाव्यात व पुन्हा कुकरचे झाकण बंद करून १ शिट्टी करून घ्यावी व आच बंद करावी व वाफ निघू द्यावी
४)आता एका छोट्या कढइत किंवा वघारीयात तेल गरम करण्यास ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी चांगली तडतडू द्यावी ,यानंतर त्यात कढीपत्ता , बारीक चिरलेला लसून,हिरवी मिरची व टोमाटो घालावा तसेच हळदही घालावी व हि तयार फोडणी वरण-चकोल्यांवर घालावी  व १ ते २ मिनिटात आच बंद करून यावर बारीक चिरलेली कोथांबीर घालावी व वरून साजूक तूप घालून चकोल्या सर्व्ह कराव्यात .
टीप-
१)यात पाण्याचे प्रमाण नेहमीच्या वरणासाठी ठेवतो त्यापेक्षा  जास्तच ठेवावे .
२)चकोल्यात साजूक तूपाएवजी लोणच्याचे तेल घालून खाल्ले तरी छान लागते .
 

 

आलू पराठा

आलू पराठा
साहित्य-
१)उकडलेले बटाटे -४ ते ५ (मध्यम आकाराचे )
२)गव्हाची कणिक -३ कप
३)हळद-चिमुटभर
४)धणेपूड-१ टी स्पून
५)लाल तिखट-२ टी स्पून
६)चवीपुरते मीठ
७)गरजेनुसार तेल
८)कोथिंबीर
९)आल-लसून पेस्ट-१ टी स्पून
कृती-
१)प्रथम कणकेत थोडे मीठ व तेल घालून कणिक घट्टसर मळून घ्यावी .
२)उकडलेले बटाटे किसून घ्यावेत .एका कढइत तेल गरम करावे तेल गरम झाले कि त्यात आल-लसून पेस्ट ,हळद,धणेपूड,लाल तिखट व किसलेले बटाटे घालावेत व चांगले एकजीव करून घ्यावे
आता यात चवीनुसार मीठ घालावे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करावे व मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे.
३)आता कणकेचा लहान गोळा घ्यावा व छोट्या पुरिएवढा लाटून घ्यावा व यात तयार  बटाट्याच्या मिश्रणाचा एक गोळा मध्यभागी ठेवावा व हा गोळा पूर्णपणे झाकला जाईल यारीतीने पुरीचे तोंड बंद करावे .
४)आता ह्या गोळ्याला थोडे पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा व गरम तव्यावर तेल सोडून शेकून घ्यावा .गरम गरम पराठा दही किंवा लसून-शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व्ह करावे.
 

 

गोड पुऱ्या

साहित्य-

१)गव्हाची कणिक -३ वाट्या

२)बारीक चिरलेला गूळ-पाऊन वाटी

३)भाजलेली तीळ-१ टी स्पून

गोड पुऱ्या

४)तळण्यासाठी तेल

कृती-

१)प्रथम एका भांड्यात बारीक चिरलेला गूळ व ३ वाट्या कणिक भिजवायला लागेल इतके पाणी एकत्र करावे व हे पाणी गॅसवर ठेवून एक उकळी काढावी म्हणजे गूळ पूर्णपणे पाण्यात विरघळला असेल ,आता हे पाणी गाळून घ्यावे म्हणजे  गुळात काही कचरा वैगरे असेल तर तो गाळला जाईल .हे पाणी जरा कोमट  होऊ द्यावे मग कणिक मळायला घ्यावी .

२)आता एका बाउलमध्ये गव्हाची कणिक घ्यावी त्यात तीळ घालावी व वरील गुळाच्या पाण्याने ही कणिक घट्टसर भिजून घ्यावी व थोडा वेळ झाकून ठेवावी .

३)वरील तयार पीठाचे छोटे गोळे घेऊन पुऱ्या लाटून घ्याव्यात व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात .ह्या पुऱ्या लोणचं किंवा लसूण-शेंगदाणा चटणीसोबत छान लागतात .गोड पुर्या आणि बटाटा भाजी हे कोम्बिनेशनही मस्त लागते

इन्स्टन्ट आप्पे

साहित्य-

१)रवा -१ वाटी

२)उडीद डाळीचे पीठ-१/४ वाटी

३)सोडा-१/२ टी स्पून

४)सायट्रिक एसिड क्रिस्टल्स-१ टी स्पून

आप्पे

५)एनो-१/२ टी स्पून

६)आलं-लसूण-मिरची पेस्ट-१ टी स्पून

७)बारीक चिरलेली कोथींबीर

८)चवीनुसार मीठ

९)गरजेनुसार तेल

१०)ताक गरजेनुसार

कृती-

१)प्रथम मिक्सरच्या एका भांड्यात रवा,उडदाचे पीठ,एनो.सोडा,सायट्रिक असिड क्रिस्टल व चवीनुसार मीठ घालून फिरवून घ्यावे म्हणजे मिश्रण चांगले एकजीव होईल .

२) आप्पेपात्र गरम करत ठेवावे ते गरम होईस्तोवर वरील तयार मिश्रणात ताक किंवा पाणी घालून मिश्रण इडलीच्या पीठाइतपत घट्टसर भिजवावे ,आता यांत आलं-लसूण-मिरची पेस्ट तसेच बारीक चिरलेली कोथींबीर घालून मिश्रण एकजीव करावे .

३)आता आप्पेपात्राला थोडे तेल लावून त्यात वरील तयार मिश्रण ओतावे व झाकण लावून ठेवावे एक बाजू चांगली खरपूस झाली कि आप्पेपात्रासोबत मिळणाऱ्या काट्याने दुसरी बाजू उलटून घ्यावी व थोडे तेल सोडून पुन्हा झाकण ठेवून दुसरी बाजूही खरपूस करून घ्यावी .

आप्पे

४)तयार आप्पे टोमॅटो सॉस किंवा  नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे .

दडपे पोहे

साहित्य-

१)पातळ पोहे -३ मूठभर

२)१ मोठा कांदा -बारीक चिरून

३)खवलेला ओला नारळ-३ ते ४ टेबल स्पून

४)लिंबाचा रस -दीड टेबल स्पून

५)शेंगदाणे-१ टेबल स्पून

दडपे पोहे

६)२ हिरव्या मिरच्या -बारीक चिरून

७)साखर-१ टी स्पून

८)जिरे-मोहोरी -१ टी स्पून

९)कढीपत्ता -४ ते ५ पाने

१०)चवीनुसार मीठ

११)गरजेनुसार तेल

१२)चिमुटभर हळद

कृती –

१)प्रथम एका बाउलमध्ये पोहे घ्यावेत त्यात बारीक चिरलेला कांदा व खवलेला ओला नारळ घालून हातानेच मिक्स करावे .आता यांत लिंबाचा रस ,साखर व चवीनुसार मीठ घालून पुन्हा हातानेच एकजीव करावे .

२)एका छोट्या कढल्यात किंवा वघारीयात  तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात शेंगदाणे तळून घ्यावेत व तळलेले शेंगदाणे ह्या पोह्यात टाकावे .आता त्याच गरम तेलात जिरे-मोहोरी घालून तडतडू द्यावी त्यानंतर कढीपत्ता ,हिरव्या मिरच्या  ,हळद घालून थोडा वेळ राहू द्यावे व ही तयार फोडणी पोह्यात घालावी व पुन्हा हातानेच एकजीव करावे .

३)आता ह्या पोह्याच्या बाउलवर एक घट्ट झाकण ठेवावे म्हणजेच ते दडपून ठेवावे व ५ ते १० मिनिटात वरून बारीक चिरलेली कोथींबीर घालून दडपे पोहे सर्व्ह करावे .

टीप-

आवडत असल्यास यांत बारीक चिरलेली काकडीही घालू शकतात .

कणकेचा शिरा

साहित्य

१)पाऊन वाटी गव्हाची जाडसर कणिक

२)पाव वाटी तूप

३)अर्धी वाटी साखर

४)१ ते दीड वाटी दूध

शिरा

५)आवडीप्रमाणे सुका मेवा

टीप-

मी यांत खारीक-खोबरे,काजू-बदाम हे सर्व जिन्नस मिक्सरमधून जाडसर फिरवून घेऊन हा कूट शिऱ्यासाठी वापरला होता .

कृती-

१)प्रथम एका कढईत तूप गरम करत ठेवावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व चांगले परतून घ्यावे .मिश्रण जास्त कोरडे वाटल्यास अजून थोडे तूप घालावे .कणिक चांगली लालसर परतून घ्यावी .

२)कणिक चांगली लालसर झाली कि त्यात १ ते दीड वाटी गरम दूध घालावे व लगेचच साखर घालावी व चांगले परतून घ्यावे .आता  लगेचच यांत सुका मेवा घालून परतून घ्यावे .

३)शिरा खाली चिटकू शकतो म्हणून सतत परतत रहावे ,दूध घातल्यानंतर साधारण ५ मिनिटातच कणिक आळायला लागते म्हणजेच समजावे कि  शिरा तयार झालेला आहे लगेच आच बंद करून गरमागरम शिरा सर्व्ह करावा .

टीप-

१)या शिऱ्यासाठी आपण साधी पोळ्यांची कणिकही वापरू शकतो पण त्यासाठी ही कणिक खूप जास्त भाजावी लागते नाहीतर शिरा एकदम चिकट येतो .

२)कणिक चांगली लालसरच भाजली गेली पाहिजे नाहीतर शिऱ्याची चव बिघडण्याची शक्यता असते .

भेंडी तवा फ्राय

 

साहित्य-

१) पाव किलो  भेंडी

२)८ ते ९ लसूण पाकळ्या

३)१ टी स्पून जिरे

भेंडी फ्राय

४)१/२ टी स्पून मोहोरी

५)३ ते ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून

६)गरजेनुसार तेल

७)चवीनुसार मीठ

८)हळद चिमुटभर

कृती –

१)प्रथम भेंडी धुवून स्वच्छः पुसून घ्यावी व पूर्णपणे कोरडी होऊ द्यावी नाहीतर भाजी चिकट होईल व कोरडी झाल्यावर गोल आकारात बारीक चिरून घ्यावी .

२)आता एका तव्यात  तेल  गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे व मोहोरी चांगले तडतडू द्यावी त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात व चिमुटभर हळद घालावी व परतून घ्यावे .आता यांत बारीक चिरलेली भेंडी घालून चांगले परतून घ्यावे तसेच चवीनुसार मीठही  घालावे व परतून घ्यावे .

३)यावर झाकण ठेवू नये ,भाजी थोडी चिकट झाली असे वाटत असेल तर त्यात थोडा लिंबू पिळावा व परतून घ्यावे .अधून मधून परतत रहावे नाहीतर भाजी खाली चिकटण्याची शक्यता असते .साधारण १० ते १२ मिनिटातच भाजी झालेली असेल ,आच बंद करून भाजी सर्व्ह करावी .

तूरदाण्याचे पॅटीज

साहित्य-

१)हिरवे तूर दाणे-१ मोठी वाटी

२)आलं-१ इंच

३)लसूण-५ ते ६ पाकळ्या

४)हिरव्या मिरच्या -२ ते ३

५)कोथींबीर -अर्धी वाटी

६)शेंगदाणा कूट-२ टेबल स्पून

७)बेसन-२ टीस्पून

८)मीठ चवीनुसार

९)तळण्यासाठी तेल

कृती-

१)प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात तूर दाणे,आलं-लसूण,हिरव्या मिरच्या व कोथींबीर घालून थोडे जाडसर दळून घेणे

२)वरील मिश्रणात शेंगदाणा कूट व बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे व चवीनुसार मीठ घालावे

३)तयार मिश्रणाचे छोटे चपटे गोळे करून गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यत तळावे व  टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावे

टीप –

गरम तेलात आधी एक गोळा सोडून पहावा तो तेलात सुटत असेल तर अजून थोडे बेसन कालवावे व नीट एकजीव करून पुन्हा  चपटे गोळे करून टाळून घ्यावे

लहान मुलांना हा प्रकार नक्की आवडेल .

ब्रोकोली सलाड

साहित्य-

१)ब्रोकोली थोडे मोठे तुकडे करून

२) हिरव्या मिरच्या बारीक चिरून

३)जिरे,मोहोरी

ब्रोकोली सलाड

 ४)लसूण -बारीक चिरून

५)तेल गरजेनुसार

६)मीठ चवीनुसार

टीप-

ह्या सालादसाठी विशेष असे प्रमाण नाही ,साहित्य आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकतात

कृती-

१)प्रथम ब्रोकोलीचे थोडे मोठे तुकडे करून घ्यावेत तुर्र्याचे दांडे फेकू नये तेही बारीक चिरून घ्यावेत व धुवून घ्यावेत

२)एका  कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे व मोहोरी घालावी व चांगली तडतडू द्यावी त्यानंतर त्यात बारीक चिरलेला लसूण व हिरव्या मिरच्या घालाव्यात व परतून घ्यावे

३)आता ह्यात चिरलेले ब्रोकोली घालून नीट परतून घ्यावे चवीनुसार मीठ घालावे व झाकण ठेवावे  व पुढच्या २ मिनिटांतचं आच बंद करावी( कारण आपल्याला ब्रोकोली मऊ शिजवायची नाहीये नाहीतर तिच्यातील क्रंच निघून जाईल )

४)तयार ब्रोकोली सलाड एका बाउलमध्ये सर्व्ह कराव ,आवडत असल्यास लिंबाचा रस घालावा नाहीतर असेही छानचं लागते .

पोळ्यांचा चुरमा

पोळ्यांचा चुरमा

साहित्य :
१)पोळ्या २ ( शिळ्या)
२)चिरलेला कांदा १ (मध्यम आकाराचा)
३) हिरवी मिरची -२(चिरलेली)
४)जिरे ,मोहरी, कढीपत्ता फोडणीसाठी
५)हळद
६)शेंगदाणे
७) कोथिंबीर
८)मीठ (चवीपुरते )
९)तेल (गरजेनुसार)

 

 

 

कृती:
१)पोळ्यांचा  चुरा करून घ्यावा.
२)कढाईत तेल घेवून त्यात जिरे,मोहरी,कढीपत्ता टाकून फोडणी द्यावी.
३) नंतर शेंगदाणे,हिरवी मिरची ,कांदा टाकून परतून घावे.
४)हळद ,मीठ टाकून पोळ्यांचा चुरा टाकावा. सर्व जिन्नस एकजीव करून चांगले परतून घ्यावे.
५)कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.

पोळ्यांचा चुरमा