आपले अभिप्राय आम्हाला नवनवीन गोष्टी करण्यास प्रव्रुत्त करतात, आपण आपले प्रेम असेच कायम ठेवा. सुचना, अभिप्राय, मत, दुरुस्ती आम्हाला ज़रूर कळवा.

Posts tagged ‘तोंडलावणी’

भरवा मिरची

भरवा मिरची 
साहित्य-
1)जाड हिरव्या मिरच्या -5
१)बेसन-४ टेबल स्पून 
२)शेंगदाणा कूट- २ टेबल स्पून
३)आल-लसून पेस्ट-१ टी स्पून
४ )ओवा-१/४ टी स्पून
५)जिरे-१/२ टी स्पून
६)हळद-चिमूटभर
७)चवीनुसार मीठ
८)गरजेनुसार तेल
९)बारीक चिरलेली कोथांबीर
कृती-
१)प्रथम मिरच्या धुवून  ,पुसून घ्याव्यात व त्यांना मधोमध उभा काप द्यावा ,जास्तीच्या बिया काढून टाकाव्यात 
२)आता एका बाउलमध्ये बेसन,शेंगदाणा कूट,जिरे,ओवा,हळद व चवीनुसार मीठ घालून मिश्रण हाताने एकजीव करून घ्यावे ,आता यातच  एक पळीभर तेल घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यावे व यातच बारीक चिरलेली कोथांबीर घालावी .
३)वरील तयार मिश्रण मिरच्यांमध्ये नीट दाबून दाबून भरून घ्यावे .
४)आता एका कढइत तेल गरम करावे व त्यात ह्या मिरच्या मसाला भरलेली बाजू वर राहील अश्या पद्धतीने ठेवावे .मिरच्या ह्याप्रमाणे दिसतील –
५)आता कढइत थोड्याश्या पाण्याचा हबका मारून झाकण ठेवावे साधारण ५ मिनिटातच एक बाजू झालेली असेल तेव्हा बाजू उलटून घ्यावी व पुन्हा किंचितश्या पाण्याचा हबका मारून झाकण ठेवावे व दुसरी बाजू झाल्यावर आच बंद करावी व मिरच्या सर्व्ह कराव्यात .
टीप-
१) मिरच्यांमध्ये भरल्यानंतर मिश्रण  उरले  तर त्याचे मुटकुळे बनवून तेही मिराच्यान्सोबतच कढइत ठेवावे ,छान लागतात .
 

मिरच्यांची भाजी

साहित्य-

१)जाड हिरव्या मिरच्या-५ ते ६ आडव्या उभ्या चिरून

२)लसूण-५ ते ६ पाकळ्या बारीक चिरून

३)जिरे-मोहोरी-१ टी स्पून

४)शेंगदाणा कूट-दीड टेबल स्पून

५)चवीनुसार मीठ

६)गरजेनुसार तेल

७)कोथींबीर

कृती-

१)एका कढईत तेल गरम करत ठेवावे ,तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून चांगले तडतडू द्यावे आता यांत बारीक चिरलेला लसूण घालावा तसेच चिमूटभर हळद घालून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात व परतून घ्यावे .

२)मिरच्या चांगल्या परतून झाल्यावर त्यात वाटीभर पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्यावे. पाण्याला  उकळी फुटल्यानंतर त्यात शेंगदाणा कूट घालून भाजी ढवळून घ्यावी व मिरच्या मऊसर् शिजल्यावर आच बंद करावी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व हि भाजी तोंडलावणी म्हणून सर्व्ह करावी .

टीप-

मिरच्या चिरल्यानंतर त्यातील बिया काढून टाकाव्यात .